Weather Update : पुढील ३ ते ४ तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार, राज्यासाठी ४ ते ५ दिवस महत्त्वाचे; कुठे, कसा असेल पाऊस
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबईसह कोकण, घाट परिसर, मराठवाडा आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
: मुंबई : मुंबईसह, मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची आज सोमवारी सकाळपर्यंत संततधार आहे. पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं मंत्रालयाकडून सूचित करण्यात आलं आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई आणि ठाणे उत्तर-पूर्व भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस झाला. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरात रविवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसंच पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिमाण झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १० मिनिटं उशिराने धावत आहे.
महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाट परिसर, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
१२ तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस
मुंबई आणि आसपासच्या भागात गेल्या १२ तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम असून मुंबईसह रायगड, कोकणातही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.
दरम्यान, विदर्भातही पावासाने जोरदार हजेरी लावली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूरमधील पैनगंगा आणि वर्धा नदीच्या काठावरील जवळपासच्या गावात पूर आला असून गावाचा शहराशी संपर्क तुटला असून येथील वाहतूकही ठप्प झाली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















