पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
आंबेगाव व खेड तालुक्यातील ५ ठिकाणांवर छापे; १९ लाखांचा साठा जप्त
पुणे | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच ठिकाणी धाड टाकून तब्बल १९ लाख ३ हजार ३७९ रुपयांचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस तसेच समीक्षा कोल्ड्रिक जनरल अॅड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील गोदामांमध्ये गुटखा, पानमसाला व इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत ३० हजार ३९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच परिसरातील खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनामध्ये विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा व इतर अन्नपदार्थांचा १९ हजार ८८६ किलो वजनाचा व १० लाख ४९ हजार ३६४ रुपयांचा साठा नमुना तपासणीसाठी घेऊन जप्त करण्यात आला.
खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्वल सुपारी या आस्थापनातही विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा ८ लाख १६ हजार १४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, नरे येथील ओम साई फरसाण या आस्थापनाच्या तपासणीदरम्यान फाईड ग्रीन वाटाण्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी ६८ किलो वजनाचा ७ हजार ४८० रुपयांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, सकेत सूर्यवंशी व नमुना सहाय्यक श्री. साळवे यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे व प्रदीप आंबरे यांच्या उपस्थितीत पार पाडली.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळखोर व बेकायदेशीर अन्न व्यवसायिकांविरोधात अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा देत नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थांबाबत माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















