स्वच्छ दिवा अभियानासाठी नगरसेवक आदेश भगत यांचा पुढाकार.
दुकानदारांनी दुकानात डस्टबीन ठेवावे; सहायक आयुक्तांकडे लेखी मागणी
दिवा : दिवा शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लहान-मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ठेवणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अँड. आदेश भगत यांनी सहायक आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही वर्षांत दिवा शहराचे झपाट्याने शहरीकरण झाले असून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवा शहर हे पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ ठरत असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे शहरात लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नर तसेच गोडाऊन्सची संख्या वाढली आहे.
मात्र शहरातील बहुतांश दुकानांमध्ये कचरापेटीची व्यवस्था नसल्याने ग्राहकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यावर फेकला जातो. परिणामी शहरातील अस्वच्छतेत मोठी भर पडत असल्याचे आदेश भगत यांनी निवेदनात नमूद केले.
“स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिक, व्यापारी आणि दुकानदाराची आहे. प्रत्येक दुकान, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनात छोटी का होईना, कचरापेटी ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांनी देखील उपलब्ध कचरापेटीतच कचरा टाकून रस्त्यावर कचरा फेकणे बंद केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच रस्त्यांव्यतिरिक्त इमारतींच्या आवारात, दोन इमारतींमधील मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकण्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिक आणि प्रशासनाने संयुक्तपणे प्रयत्न केल्यास “स्वच्छ दिवा, सुंदर दिवा” हे उद्दिष्ट नक्की साध्य होऊ शकते, असा विश्वासही आदेश भगत यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















