Telangana News : ‘मारवाडी व्यापाऱ्यांनो परत जा.’ या घोषणेसह सध्या तेलंगणामध्ये आंदोलनाने जोर धरला
आहे. या आंदोलनाची सुरुवात सिकंदराबादमधील एका छोट्याशा वादापासून झाली, असे म्हटले जाते. रंगारेड्डी, कामारेड्डी, निजामाबाद आणि करीमनगर यासारख्या अनेक जिल्ह्यांतील स्थानिक व्यापाऱ्यांनी संघटना स्थापन करून मारवाडी व्यापाऱ्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (१८ ऑगस्ट) रंगारेड्डी जिल्ह्यातील अमनगल्लू येथे बंद पुकारण्यात आला आहे.
आंदोलनामागील कारण कंदराबादच्या मोंडा मार्केटमधील वाद असल्याचे सांगितले जाते. तिथे मारवाड्यांनी एका दलित व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गोरेटी रमेश नावाच्या व्यक्तीने एक गाणे लिहिले. या गाण्यामध्ये त्याने मारवाडी व्यावसायिकांनी केलेल्या अन्यायाचे वर्णन केले आहे. हे गाणे सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आणि आंदोलन सुरू झाले. त्यानंतर रमेश याला अटक झाली आणि त्यानंतर निदर्शने तीव्र झाली.
मारवाडी व्यापाऱ्यांमुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या दाव्यानुसार, मारवाडी व्यापाऱ्यांनी घाऊक; तसेच किरकोळ व्यापारात भाग घेतला आहे. त्यामुळे स्थानिक दुकानदार त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. मिठाईपासून ते कपड्यांपर्यंत आणि किराणा सामानापासून ते विजेपर्यंत प्रत्येक व्यवसाय त्यांच्या हातात आहे. ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना रोजगार देतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. मारवाडी व्यापारी स्थानिकांना उच्च दराने वस्तू विकतात, तर त्यांच्या समाजातील लोकांना कमी दराने विकतात. या मुद्यांमुळे मारवाडी व्यापाऱ्यांबद्दल स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















