Ganpat Gaikwad : पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह आणखी चार जणांची कल्याण कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
कल्याण : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. गणपत गायकवाड सध्या कारागृहात आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. त्यांना या प्रकरणामुळे विधानसभा निवडणूक देखील लढवता आली नाही. तसेच त्यांना जामीनदेखील अद्याप मिळालेला नाही. यानंतर आता त्यांच्याशीच संबंधित एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील 2014 च्या राडा प्रकरणी गणपत गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गणपत गायवाड यांच्यासह निलेश शिंदे आणि इतर तिघांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांच्या अभावामुळे कल्याण न्यायालयाकडून गणपत गायकवाड यांच्यासह सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. असं असलं तरी पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुक्काम जेलमध्येच राहणार आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद उफाळून आला होता. एका जमिनीच्या वादाच्या मुद्द्यावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. संबंधित प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं होतं. त्यावेळी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड हे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील पोलीस ठाण्यात होते. तसेच त्यांच्या समर्थकांची देखील पोलीस ठाण्याबाहेर गर्दी जमली होती. थोड्या वेळाने त्याठिकाणी गणपत गायकवाड आले होते.
गणपत गायकवाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच बंदूक काढत महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी राहुल पाटील यांच्यावरही गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले होते. या प्रकरणावरुन प्रचंड वातावरण तापलं होतं. गोळीबाराचा व्हिडीओदेखील समोर आला होता. हा व्हिडीओ पाहून संपूर्ण राज्य हादरलं होतं. भर पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदाराकडून गोळीबार करण्यात आला होता. एवढंच नाही तर गणपत गायकवाड यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना आपण गोळीबार केल्याचं मान्य देखील केलं होतं.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















