न्यायालयाचे प्रश्न धारदार, अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार !
महाराष्ट्र नामा दि. १८, ठाणे : अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे ठाणे महापालिकेतील अधिकारी – कर्मचारी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे गोत्यात येण्याची शक्यता असून महापालिका वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंब्रा, दिवा आणि शीळ भागातील अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्याच्या मुख्य न्यायमूर्तीना चौकशी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांची चौकशी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिका
अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक यांची साक्ष घेतली होती. महापालिका आयुक्त श्री. राव यांनी साक्ष दिली असून न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त श्री. राव यांना १९ प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लकी कंपाउंडच्या जागेवर नवीन अनधिकृत इमारत उभी राहत आहे का ? अनेक अनधिकृत इमा रतींच्या विरोधात कारवाई होऊन सुद्धा पुन्हा त्या इमारती उभ्या राहिल्या आहेत?
महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींच्या तक्रारीवरुन दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे का? त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे का? कळवा येथिल दोन अनधिकृत इमारतींच्या विरोधातील कारवाई थांबविण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते का? सहाय्यक आयुक्त प्रणाली घुगे यांनी ५२ अनधिकृत इमारतींचा अहवाल दिला
होता. त्यावेळी अतिक्रमण उपायुक्त कोण होते ? त्या इमारतीच्या विरोधात कारवाई केली होती का? त्याची सद्याची स्थिती काय आहे? त्या इमारतीच्या विरोधात कारवाई केली नसेल तर त्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमुळे महापालिकेच्या माजी आयुक्तांसह आजी-माजी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, तसेच राजकारणी गोत्यात येण्याची शक्यता असून हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे जागरुक ठाणेकरांचे म्हणणे आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर महापालिकेतील अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















