अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्यास निवडून आलेला उमेदवार अपात्र ठरणार?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असून आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता “आम्ही अनधिकृत बांधले नाही” याबाबत शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे. ‘आम्ही अनधिकृत बांधकाम केलेले नाही आणि निवडूण आल्यावर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन, असा उल्लेख उमेदवार आणि कुटुंबातील उमेदवाराला करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. आठ ते नऊ मजली इमारती भूमाफियांनी उभारल्या असून त्यावर पालिकेकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती. यातील काही बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचे आदेश देण्याबरोबरच पालिकेची कानउघडणी केली होती. यानंतर पालिकेने विशेष पथके तयार करून शहरात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू केली असून त्याचबरोबर या विभागातील अनेक अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने इतर विभागात बदल्या केल्या आहेत. असे असले तरी यातील अनेक बांधकामे
राजकीय पाठबळामुळे झाली असल्याची चर्चा होती. आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एक शपथपत्र द्यावे लागते. त्यात मालमत्तेची माहिती, अपत्य संख्या, खर्चाचा हिशोब विहित पद्धतीने सादर केला नाहीतर अपात्र ठरेन अशी माहिती नोंद करावी लागते. त्यासोबतच आता ‘आम्ही अनधिकृत बांधकाम केलेले नाही आणि
निवडूण आल्यावर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन, असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















