झुंड’चा अभिनेता प्रियांशु उर्फ बाबू क्षत्रिय याची निर्घृणपणे.हत्या नागपूर हादरलं.
नागपुरातून धक्कादायक घटना समोर येत आहे. झुंड चित्रपटातील अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर : बॉलिवूडच्या ‘झुंड’ या चर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा तरुण कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची निर्घृण हत्या झाल्याने नागपूर शहर हादरले आहे. मंगळवारी मध्यरात्री नारा परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याचाच मित्र धूप शाहू याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशु क्षत्रिय हा मंगळवारी रात्री आपल्या मित्र धूप शाहूसोबत बाहेर गेला होता. रात्री उशिरा नारा परिसरातील काही नागरिकांना तो वायरने बांधलेला, गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. नागरिकांनी तत्काळ जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशुला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासानुसार, प्रियांशुवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. प्रियांशुच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित धूप शाहू याला अटक केली आहे. नशेत झालेल्या वादातून ही हत्या घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात प्रियांशुने झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांच्या संघर्षमय आयुष्याचं वास्तवदर्शी चित्रण केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटाने समाजातील वंचित घटकांना आवाज दिला होता. प्रियांशुचं पात्र या चित्रपटातील वास्तव आणि भावनिकतेसाठी विशेष लक्षात राहिलं होतं.
मात्र, चित्रपटानंतर प्रियांशुचं आयुष्य फारसं बदललं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांशु याचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध होता. या पूर्वी प्रियांशु याच्यावर चोरीसह इतर किरकोळ गुन्ह्याची नोंद आहे. त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली बेड्या ही घातल्या होती. तर काही काळ त्याला कारागृहातही राहावे लागले होते. दरम्यान, जरीपटका पोलिसांनी नारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून तपासाचा वेग वाढवला आहे. फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मेयो रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झाले असून अहवालानंतर अधिक तपशील स्पष्ट होईल.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















