चार वर्षांनंतर लागला निकाल: अल्पवयीन असताना केली होती हत्या, हत्येच्या नऊ दिवसानंतर दिली कबुली; ‘त्या’ अल्पवयीन आरोपीला जन्मठेप
छत्रपती संभाजीनगर: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि चार वर्षांपूर्वी घडलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, जो घटनेच्या वेळी अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त बालक) होता, त्याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि क्रूरता पाहता, त्याला ‘प्रौढ’ समजून हा खटला चालवला गेला होता.
नेमकं प्रकरण काय? ११ ऑक्टोबर २०२१ च्या पहाटे मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजन शिंदे यांची त्यांच्या एन-२ सिडको येथील राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिंदे गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यात डंबेल्स घालून आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापून त्यांची हत्या करण्यात आली होती.
या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांना कोणतेही ठोस धागेदोरे मिळत नव्हते, परंतु पोलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर आणि सायबर सेलच्या मदतीने या गुन्ह्याचा उलगडा झाला.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा:
हत्येच्या ९ दिवसानंतर कबुली: हत्येनंतर पहिले काही दिवस पोलीस तपासात कोणतीही प्रगती झाली नव्हती. मात्र, घरातील व्यक्तींच्या जबाबातील तफावत आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितावर लक्ष केंद्रित केले. अखेर हत्येच्या ८-९ दिवसांनंतर, अल्पवयीन आरोपीने आपल्या एका जवळच्या नातेवाईकाजवळ आणि पोलिसांसमोर रडून गुन्ह्याची कबुली दिली.
‘डार्क वेब’ आणि वेबसीरिजचा वापर: तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपीने हत्येचा कट रचण्यापूर्वी क्राईम वेबसीरिज आणि चित्रपट पाहिले होते. तसेच, पोलिसांना आपल्या मोबाईल सर्च हिस्टरीचा पत्ता लागू नये म्हणून त्याने ‘टॉर’ (Tor) या ब्राऊजरचा (डार्क वेब) वापर करून ‘हत्या कशी करावी’ आणि ‘पुरावे कसे नष्ट करावेत’ याची माहिती शोधली होती.
हत्येचे कारण: प्राप्त माहितीनुसार, प्रा. शिंदे आणि आरोपी यांच्यात सतत खटके उडत होते. आरोपीच्या मनात शिंदे यांच्याबद्दल प्रचंड राग होता. घटनेच्या काही तासांपूर्वी त्यांच्यात झालेल्या वादात शिंदे यांनी “एकतर तू राहशील किंवा मी राहीन,” असे वाक्य वापरल्याचा दावा करण्यात आला होता. या भीतीपोटी आणि रागाच्या भरात आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने गुन्ह्यात वापरलेले डंबेल्स आणि चाकू जवळच असलेल्या एका गाळाने भरलेल्या विहिरीत फेकून दिले होते, जे नंतर पोलिसांनी शोधून काढले.
न्यायालयाचा निकाल: आरोपीचे वय घटनेच्या वेळी १७ वर्षे ८ महिने होते. मात्र, निर्भया प्रकरणानंतरच्या कायद्यातील बदलांनुसार आणि गुन्ह्याची भीषणता (Heinous Crime) लक्षात घेऊन, ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने त्याला प्रौढ समजून खटला चालवण्यास परवानगी दिली होती. सत्र न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालानंतर आरोपीची रवानगी बालसुधारगृहातून हर्सूल मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















