निगडे गावच्या प्रवेश कमानीला टेम्पोची जोरदार धडक; कमान पूर्णपणे कोसळली.
दापोली : दापोली-ओळगाव मार्गे बुरोंडीकडे जाणाऱ्या वाहनामुळे निगडे गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचे मोठे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, MH20 BL 243 क्रमांकाच्या गाडीचे चालक बी.एस. दर्शने व सहकारी जी.एस. मुंडे हे प्रवास करत असताना संबंधित टेम्पो क्रमांक MH08 G 2700 ने निगडे गावाच्या प्रवेश गेटला जोरदार धडक दिली. धडकेनंतर गावाची कमान पूर्णपणे तुटून खाली कोसळली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. “गावाची ओळख असलेली कमान तात्काळ पुन्हा उभारून द्यावी,” अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. मात्र कमानीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित घटनेची माहिती स्थानिक प्रशासन व पोलिसांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















