माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजीनाट्य
ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजानीमा दिला आहे.
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातच पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आली आहे. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेत हा मोठा भूकंप असल्याचं मानलं जात आहे. मिनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख आहेत. त्यांनी आता आपल्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मिनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे.
मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामागील कारण काय?
काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक भूषण भोईर यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. त्यांनी आपला विरोध प्रदर्शन केला होता. पण त्याच विरोध प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. वायकर नावाच्या शाखाप्रमुखांवर कारवाई करण्यात आली आहे. ते मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावर कारवाई केल्याने मिनाक्षी शिंदे या नाराज झाल्या. त्याच नाराजीतून मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी या पदावर काम करण्यास योग्य नसल्याने मी या पदाचा राजीनामा देत आहे”, असं मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे. त्यामुळे मिनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यात काही प्रयत्न केले जातात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकते?
मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याची टायमिंग ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण ठाणे महापालिकेची सध्या निवडणूक आहे. येत्या 15 जानेवारीला ठाणे महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. असं असताना पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते देखील नाराज झाले आहेत. अशा परिस्थिती मिनाक्षी शिंदे यांची मनधरणी करणं हाच शिंदे यांच्यासाठी सोपा आणि महत्त्वाचा पर्याय आहे. तरंच पक्षात डॅमेज कंट्रोल होईल. यासाठी आता एकनाथ शिंदे हे काय पाऊल उचलतात ते महत्त्वाचं आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















