पार्किंगच्या वादातून तिघांना बेदम मारहाण; डोक्यात बाटली फोडून जीवे मारण्याची धमकी.
दापोलीत खळबळ; सात जणांवर गुन्हा, चौघांना अटक
दापोली : पार्किंगच्या किरकोळ वादातून तिघांना बेदम मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोली येथे १५ मे रोजी घडली. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना १२ टाके पडले आहेत.
याप्रकरणी दापोली पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, दोघे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक दत्ताराम शेडगे (वय ४०, सध्या रा. विरार पश्चिम, जि. पालघर; मूळ रा. टांगर, दापोली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दीपक शेडगे हे त्यांचे चुलत भाऊ प्रवीण प्रताप जेधे आणि स्वप्नील मारुती शेडगे यांच्यासोबत कामानिमित्त दापोली येथे आले होते.
दापोलीतील सावंत इमारतीसमोर त्यांनी आपली कार उभी केली होती. त्याच ठिकाणी समोरच्या बाजूला एक रिक्षा-टेम्पो उभा असल्याने गाडी काढण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधित वाहन हटविण्याची विनंती केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
यानंतर दीपक शेडगे व त्यांचे सहकारी दापोली-मंडणगड रस्त्यावर खरेदीसाठी थांबले असता, दुचाकीवरून आलेल्या आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अकलाक अल्लाउद्दीन आलम (सर्व रा. खोडा, दापोली) व अन्य चार जणांनी पुन्हा वाद घालत हल्ला चढविला.
संशयितांनी कारवर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली तसेच कारमधून तिघांना बाहेर ओढून बेदम मारहाण केली.
“दापोलीत आमची दहशत आहे, तुम्हाला इथे कोण वाचवायला येणार नाही,” अशी धमकी देत आफ्रिदी जोगिलकर याने काचेची बाटली दीपक शेडगे यांच्या डोक्यात फोडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३२४ (३), ११५ (२), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आफ्रिदी अहमद जोगिलकर आणि अकलाक अल्लाउद्दीन आलम यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















