लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप
पनवेल | प्रतिनिधी
लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात जाळल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यात उघडकीस आली आहे. अत्यंत थंड डोक्याने नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून पनवेल तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
११ एप्रिल २०२६ रोजी चिंचवली-वाकडी गावाच्या हद्दीतील वनक्षेत्रात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णतः जळालेल्या स्थितीत असल्याने मृत महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र अथवा ठोस पुरावे सापडले नव्हते.
पनवेल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता महिलांच्या नोंदी, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली. मृत महिलेच्या जवळ आढळलेली अंगठी, नथ, कानातील दागिने आणि मनगटावरील दोरा यांच्या आधारे अखेर मृत महिलेची ओळख पटली. अनितादेवी भगवान राजभर (वय ३०, रा. मुंब्रा-दिवा परिसर) असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान अनितादेवीचा सतत संपर्क करण नामदेव पाटील (वय २७) या तरुणाशी असल्याचे पोलिसांना आढळून आले. चौकशीसाठी बोलावूनही आरोपी हजर न राहिल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत अखेर अटक केली.
पनवेल पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी करण पाटील आणि मृत महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, महिला सातत्याने लग्नासाठी दबाव टाकत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या नात्यातून कायमची सुटका मिळवण्यासाठी आरोपीने कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
६ एप्रिल २०२६ रोजी आरोपीने अनितादेवीला आपल्या होंडा सिटी कारमधून निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी सळीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगल परिसरात नेऊन पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या थरारक हत्याकांडाचा पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















