राज्यभरातील बोगस मेडिकल दुकानांवर प्रशासनाचा धडक कारवाईचा इशारा; फार्मासिस्ट नसल्यास दुकाने तात्काळ सील होणार
ठाणे.
राज्यातील औषध विक्री व्यवसायात सुरू असलेल्या गंभीर अनियमिततेवर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, फार्मासिस्टशिवाय सुरू असलेल्या मेडिकल दुकानांविरोधात राज्यभर विशेष तपास मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या जीवाशी थेट संबंधित असलेल्या औषध विक्रीत कोणतीही बेफिकिरी सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मुंडे यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने तपास मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासादरम्यान पात्र व नोंदणीकृत फार्मासिस्ट अनुपस्थित आढळल्यास संबंधित मेडिकल दुकान कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ सील करण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औषधे ही सामान्य व्यापाराची वस्तू नसून ती थेट नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी निगडित आहेत. त्यामुळे औषध विक्री करताना प्रशिक्षित आणि अधिकृत फार्मासिस्ट उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र राज्यातील अनेक भागांत नियमांना हरताळ फासून मेडिकल दुकाने सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
तपास मोहिमेदरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवसाय सुरू करणे, दुसऱ्या फार्मासिस्टच्या नावाचा गैरवापर करणे, परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणे तसेच नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री करणे असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. औषध विक्रीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्यभर व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे,” अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
राज्यातील बोगस आणि नियमबाह्य मेडिकल व्यवसायावर आता प्रशासनाचा थेट वचक बसणार असल्याने औषध विक्री क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















