*माऊली फर्निचर जालगावकडून विद्यालयाला HP कलर प्रिंटर भेट*
शिक्षणाच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी श्री. नंदू शिगवण (मालक – माऊली फर्निचर जालगाव) यांनी कै. कमलाकर जनार्दन तथाभाई जावकर विद्यामंदिर तेरेवायंगणी या विद्यालयाला एचपी कंपनीचा अत्याधुनिक कलर प्रिंटर सप्रेम भेट दिला.
या प्रिंटरमुळे विद्यालयाच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजाला मोठी चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे रंगीत प्रिंटआउट, विविध शालेय कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि उपक्रमांसाठी आवश्यक साहित्य आता अधिक वेगाने व दर्जेदार पद्धतीने तयार करता येणार आहे.
प्रिंटर स्वीकृतीच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत शिगवण सर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे शक्य होईल. श्री. नंदू शिगवण यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाला दिलेली ही भेट निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या या योगदानाबद्दल विद्यालय परिवार त्यांच्या ऋणात राहील.”
यावेळी श्री. नंदू शिगवण यांनीही आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शाळेला मदत करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. भविष्यातही शिक्षण क्षेत्रासाठी शक्य ते सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या उपक्रमामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून श्री. नंदू शिगवण यांच्या सामाजिक जाणीवेचे आणि दातृत्वाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. समाजातील उद्योजकांनी शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्य संपादक: संदीप जाधव
























