शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली.
रत्नागिरी : कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत शिमगोत्सवासाठीच मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे निघालेल्या भाविकांच्या बसला मोठा अपघात झाला असून यामध्ये तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खेड-धामणंद मार्गावर अपघात
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पहाटेच्या सुमारास एका खासगी आराम बसला भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला पलटल्याने या बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवासी साखर झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी, 6 मार्च 2026, पहाटे खेड-धामणंद मार्गावर ही भीषण दुर्घटना घडली.
मुंबईतील प्रवासी जखमी
मुंबईतील बोरिवलीकडून खेड तालुक्यातील सापिर्ली गावाकडे हे सगळे प्रवासी निघाले होते. ग्रामदेवतेच्या पालखी दर्शनासाठी ही सगळी भाविकभक्त मंडळी सापिर्ली व धामणंद परिसरात येत असताना हा अपघात घडला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत या बसमध्ये अडकलेल्या सगळ्या 28 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील बहुतांशी प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे 28 पैकी 25 प्रवासी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच एनवरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अत्यंत तत्परतेनं बचाव कार्य राबवत बसमध्ये अडकलेल्या 28 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. या सगळ्यांना तात्काळ कळंबळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही हा अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून या अपघाताची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.
आणखी एक दुर्घटना
दरम्यान, गुरुवारी सकाळी 6 वाजतासुद्धा अशीच एक दुर्घटना घडली होती. शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कागे शिवारा येथे एक एसटी बस ट्रकला धडकली. कोल्हापूरहून माजगावला जाणारी ही एसटी बस रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कंडक्टक, बस चालक आणि 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव
























