


डोंबिवली / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शिळफाटा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
भेटीदरम्यान माजी आमदार सुभाष भोईर यांनी भारत गिअर ते कल्याण फाटा तसेच कल्याण-शिळ रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. भारत गिअर ते काटई उन्नत मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून पहिला टप्पा लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंजूर असलेल्या विकास बाह्य रस्त्यांसाठी (डीपी रोड) आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीही करण्यात आली.
दिवा शहरासाठी मंजूर असलेले स्वतंत्र दिवा पोलीस स्टेशन तातडीने सुरू करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही यावेळी करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच कल्याण फाटा परिसरात उभारण्यात येत असलेल्या श्री दत्त मंदिरासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी प.पू. डी.के. दास महाराज सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक घेण्याचे आदेश देत निधीअभावी कोणतेही काम रखडू दिले जाणार नसल्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी नगरसेवक दिपेश म्हात्रे, महेश पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, पूजा योगेश म्हात्रे, प्रतिक्षा जयेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















